बिहार मध्ये अग्नीपथचा संघर्ष पेटला…

0
186

नवी दिल्ली :दि. १८ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये या नव्या योजनेबाबत रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे. अग्निपथबाबत बिहारमधील तरुणांचा संताप थांबताना दिसत नाही. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने सुरू आहेत. आंदोलक तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी पहाटे जेहानाबादमध्ये तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली.

जेहानाबाद जिल्ह्यातील तेहता येथे आंदोलकांनी ट्रक आणि बस पेटवून दिली. ही घटना तेहटा आऊट पोस्टजवळची आहे. तसेच, आंदोलकांनी दगडफेकही केली. रस्त्यावर दगड पसरलेले दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक केल्याची माहिती मिळताच जेहानाबादचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.

बिहारमधील अनेक जिल्हे अग्निपथच्या आगीत जळत आहेत. आंदोलकांनी तीन दिवसांत अनेक गाड्या जाळल्या आणि अनेक गाड्याही जाळल्या. बिहारची परिस्थिती पाहता बिहार सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचा हा आदेश उद्यापर्यंत म्हणजेच १९ जूनपर्यंत लागू असेल.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे. बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. यात बिहार व तेलंगणध्ये प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला.

आंदोलक रस्त्यावर उतरल्याने देशाच्या अनेक भागांत २०० रेल्वे रद्द केल्या. पूर्व मध्य रेल्वेच्या १६४, उत्तर पूर्व रेल्वेच्या ३४, उत्तर रेल्वेच्या १३ व पूर्वोत्तरच्या ३ रेल्वे रद्द केल्या आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य रेल्वेने ६४ रेल्वेंना मध्येच थांबविले आहे. बिहारमध्ये १२ जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. सैन्य भरतीच्या नव्या प्रक्रियेविरुद्ध रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी १८ जून रोजी बिहार बंदची हाक दिली आहे.

तेलंगणात सिकंदराबाद स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर आणि रेल्वेला आग लावल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सिकंदराबादमध्ये ३०० ते ३५० लोकांच्या जमावाने एका रेल्वेच्या पार्सल कोचमध्ये आग लावली. या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला.