बा‌ळासाहेब ठाकरेंना अटक ही राष्ट्रवादीची चूकच; अजित पवारांची खंत

0
430

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचे राजकारण कोणी करू नये, असेही म्हटले होते. त्यावेळी आमच्या मताला किंमत नव्हती.  त्यामुळे तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी व्यक्त केली .

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या अटकेविषयी आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीकडे  विचारणा केली होती. यावर  ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत.  या मुलाखतीवेळी अजित पवार यांनी  त्या व्यक्तीचे नांव घेतले नसले तरी त्यांचा रोख छगन भुजबळ यांच्याकडे होता.  कारण बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा छगन भुजबळ  तत्कालीन गृहमंत्री होते.

शरद पवार यांची ईडी चौकशी ही राजकीय सूडभावनेने झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  या आरोपांचा समाचार घेताना  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना    झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती.  यावर  अजित पवार यांनी बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य होती, असे सांगून खंत व्यक्त केली आहे.