‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

188

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०१९ दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील ६९२ तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. दाखल तक्रारींपैकी ४९० तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले.

आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वत: भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपद्वारे तक्रार करू शकतात.

प्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या ५२ तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाकदपटशा करण्याच्या २ तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या १३ तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या १२, मद्य वितरित करण्याच्या १४, विनापरवाना पोस्टरच्या ५८९, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांसंदर्भातील ९ तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या २२ तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या ८ तक्रारी आणि इतर ४७१ तक्रारींचा यात समावेश आहे.

वाशिम  जिल्ह्यातून सर्वाधिक १८८ तक्रारी प्राप्त आहेत. सोलापूर १६५, ठाणे १४०, पुणे १३८, मुंबई उपनगर ४५, मुंबई शहर ३३ तर सर्वात कमी सिंधुदुर्गमधून १ तक्रार प्राप्त झाली आहे. याशिवाय अहमदनगर ३९, अकोला ६, अमरावती ७०, औरंगाबाद १५, बीड ६, भंडारा ७, बुलडाणा १८, चंद्रपूर ३, धुळे ७, गडचिरोली २, गोंदीया २९, हिंगोली ८, जळगाव २३, जालना ६, कोल्हापूर १६, लातूर ११, नागपूर ४०, नांदेड २६, नंदूरबार ३, नाशिक ७, उस्मानाबाद ११, पालघर २४, परभणी १४, रायगड २०, रत्नागिरी १०, सांगली १६, सातारा १७, वर्धा ११, यवतमाळ १८ याप्रमाणे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास सी व्हिजील ॲपद्वारे नागरिकांना तक्रार दाखल करता येते. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. नागरिक आपली ओळख गुप्त ठेवूनही या ॲपवर तक्रार दाखल करु शकतात.

WhatsAppShare