बाबा चिडल्याचे सुप्रिया सुळे यांनाही आश्चर्य

0
795

 मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत नातेवाईकांशी संबंधित एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिडल्यामुळे राज्यभरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. खुदद् पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘५० वर्षांत मी त्यांना कधी असे चिडलेले पाहिले नाही,’ असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पक्षातील नेत्यांबरोबर तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत, असा प्रश्न शुक्रवारी पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते संतापले आणि पत्रकार परिषदेतून उठले. त्यांचा हा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुप्रिया सुळे या देखील वडिलांच्या वागण्याने चकित झाल्या आहेत. तशी कबुलीच त्यांनी दिलीय. ‘कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांदाच चिडलेला दिसला. मलाही आश्चर्य वाटले. ५० ते ५२ वर्षांत मी त्यांना कधी असे पाहिलेले नाही. पण वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला एकच प्रश्न पाचवेळा विचारल्यावर चीडचीड होऊ शकतो. शेवटी माणूस आहे. खरंतर आपल्या पिढीने याबाबत आत्मचिंतन करायला हवे,’ असे सुळे म्हणाल्या.