महात्मा फुले महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
423

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात रयत शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, “युवकांनी शिक्षणाशिवाय असलेली आपली गुणवत्ता अर्थार्जनासाठी वापरली पाहिजे. आपल्या मधील कौशल्याचा वापर करून त्यांनी उत्तम नोकर्‍या मिळविल्या पाहिजेत, ही संधी त्यांना या मेळाव्यात मिळालेली आहे.

त्या वेळी नगरसेवक हिरानंद आसवाणी, उषाताई वाघेरे, निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे डॉ. मनोहर चासकर, रोजगार मेळाव्याचे समन्वयक रविंद्र क्ंग्राळकर, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे सल्लागार समिती अध्यक्ष भाऊसाहेब वाघेरे उपस्थित होते. यावेळी या मेळाव्यात विविध राष्ट्रीय– आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व शेकडो युवकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेने काळाची पावले ओळखत कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. त्याच ज्ञानाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी रोजगार मेळाव्यात नोकर्‍या संपादक कराव्यात”.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य संजोग वाघेरे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सोनल बावकर यांनी केले तर आभार प्लेसमेंट विभागाचे चेअरमन प्रा. अनिकेत खत्री यांनी मानले.