बाबरी मशीद प्रकरणी आज निकाल

0
511

नवी दिल्ली, दि. ३० (पीसबी) – १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले आहेत. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यापैकी कोणीही उपस्थित नसणार आहे. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत.