बापरे! खडक पोलीस ठाण्याच्या भागात चोरट्यांनी गोळीबार

0
260

पुणे,दि. ०२ (पीसीबी) : चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांकडून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

साधारणपणे 45 वर्षांचा असलेला हा चोरटा चोरीच्या उद्देशाने खडक माळ आळी येथे आला होता. खडक माळ आळीमध्ये असलेल्या चर्चजवळ असलेल्या एका केक शॉपमध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरी करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी चोरट्याने त्याच्याकडील बंदुकीमधून गोळी झाडली. स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धावले. या चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या सोबतच तो येरवडा कारागृहातून फरार असल्याचे देखील समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.