बांधकामाचा दर्जाही ‘रेरा’ तपासणार; निकृष्ट घरे बांधणाऱ्या बिल्डरांना दणका

0
725

मुंबई, दि. १ (पीसीबी) – घरांच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीच्या दर्जाचा अहवाल संबंधित बिल्डरच्या अभियंत्याने ‘रेरा’ला सादर करणे महारेरा प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. आता प्राधिकारणाने घरांच्या दर्जाकडेही लक्ष देण्याचा निर्णय घेतल्याने बिल्डरांना चांगली घरांची निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना उत्कृष्ट घरे मिळणार आहेत.    

राज्यात ‘रेरा’मुळे  गृहनिर्माण उद्योगाला शिस्त लागली आहे. बिल्डरांवर वचक ठेवण्यात रेरा प्राधिकरणाला यश आले आहे.  त्यामुळे देशभरात महाराष्ट्रातील रेरा प्राधिकरणाचा नावलौकिक वाढला आहे. आता प्राधिकरणाने आणखी एक  निर्णय घेत बांधकामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यासाठी विशेष तरतूद  केली आहे. वास्तविक मूळ रेरा कायद्यात बांधकामाच्या दर्जाचा उल्लेख नाही. मात्र, प्राधिकरणाने विशेष अधिकारात या कायद्यात  सुधारणा केली आहे. बांधकामाच्या दर्जाबाबतही सजग असणारे रेरा हे  देशातील पाहिले प्राधिकरण ठरणार आहे.

सध्या रेराकडून  व्यावसायिकांना तीन प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात आहेत. त्यात आता अभियंत्याच्यावतीने   दिल्या जाणाऱ्या आणखी एका प्रमाणपत्राचा समावेश केला आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याविषयी हे प्रमाणपत्र असेल. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणता माल वापरला, त्याचे प्रमाण किती होते, दर्जा काय होता, याची तपासणी करून अहवाल  अभियंत्यांनी  ‘रेरा’ला देणे बंधनकारक  करण्यात आले आहे.  त्यामुळे प्लम्बर, वायरमन, पेंटर, गवंडी, बार बेंडर (जाड सळया वाकवणारे कामगार), सुतार, टाइल्स बसवणारे कारागीर आदी आठ प्रकारातील कारागीर ‘रेरा’च्या कक्षेत येणार आहेत.  त्यामुळे अकुशल  कारागिरांकडून निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या प्रकारांना आळा बसणार आहे.