चोरीचे खोटे आरोप करून ८ लाख उकळणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर पिंपरीत खंडणीचा गुन्हा; पोलीस आयुक्तांचा दणका

0
2619

  पिंपरी, दि. १ (पीसीबी) – मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक केली. त्याचबरोबर त्याला बेदम मारहण करून शॉक देत त्याच्याकडून ८ लाख रूपये उकळणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलला आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि इतर कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि.३०) दिले आहेत. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे याला मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून तरूणाला अटक केली. तसेच त्याला जबर मारहाण करत विजेचा करंड दिला. चौकशीदरम्यान तरूणाकडे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे नाळे यांनी या तरूणाला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देऊन ८ लाख रूपये घेतले. तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही.

दरम्यान, तरूणाच्या नातेवाईकांनी घडलेला सर्व प्रकार प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर या प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत नाळे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.