फुरसुंगी पोलिस चौकीत राडा घालणाऱ्या मद्यपी महिलेला अटक

0
508

हडपसर, दि. १९ (पीसीबी) – पोलिस चौकीत राडा घालून महिला पोलिस शिपायाला मारहाण करत संगणकाची तोडफोड करणाऱ्या एका मद्यपी महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना फुरसुंगी पोलिस चौकीत घडली.

याप्रकरणी महिला पोलिस शिपाई सारिका घोडके यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २७ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गुरुवारी सकाळी भाड्याने रिक्षा केली होती. तिने त्या रिक्षा चालकाला बराच वेळ या भागात फिरविले. त्याने भाड्याचे पैसे मागितल्यानंतर ती त्यालाच शिवीगाळ करू लागली. त्याला मारहाणही केली. यामुळे रिक्षा चालक विठ्ठल शिंदे हे फुरसुंगी पोलिस चौकीत या महिलेला घेऊन आले. तसेच, घडलेला प्रकार सांगितला. तत्पूर्वी आरोपी महिलेने मद्यपान केले होते. चौकीत आल्यानंतरही ती शिवीगाळ करत होती.

दरम्यान, यातील फिर्यादी घोडके या शिंदे यांची तक्रार नोंदवून घेत होत्या. या वेळी आरोपी महिलेने त्यांनी तक्रार नोंदवून घेऊ नये, यासाठी चौकीतच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, फिर्यादी घोडके यांची कॉलर पकडली. त्यांना खुर्चीवरून खाली ओढत धक्काबुक्की केली. तर, संगणक फोडण्याचा प्रयत्न करत त्याचा की-बोर्ड फोडला. यानंतर गुन्ह्याची कागदपत्रे फाडून टाकली. त्यानंतर तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.