जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणी प्रक्रियेचा आढावा

0
451

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज (रविवार)  मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. मतमोजणी कक्ष, पत्रकार कक्ष, मतमोजणी कर्मचारी प्रशिक्षण,  सार्वजनिक संदेश व्यवस्था,  वाहनांची पार्किंग आदींची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्तात्रय कवितके, स्नेहल बर्गे, भानुदास गायकवाड, प्रकाश अहिरराव, संजय देशमुख, भाऊसाहेब गलांडे, आरती भोसले, निता सावंत, सचिन बारावकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्‍ह्यातील मावळ, शिरुर, पुणे आणि बारामती या ४ लोकसभा मतदार संघाच्या  मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जिल्‍ह्यातील लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (दि.२३) होणार आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल तर पुणे आणि बारामती मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात होणार आहे.