फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्येच झाली चोरी

0
245

चाकण, दि.29 (पीसीबी) : फायनान्स कंपनीच्या ऑफिसच्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या उघड्या खिडकीतून ऑफिसमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी 21 हजार 526 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी नऊ वाजता मुटकेवाडी येथील साई कार्पोरेट बिल्डिंग परिसरात उघडकीस आली.

विकास अशोकराव कांबळे (वय 30, रा. खेडकरमळा, चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वस्ती फायनान्स प्रा. ली. या कंपनीत काम करतात. त्यांचे ऑफिस मुटकेवाडी येथील साई कार्पोरेट बिल्डिंगमध्ये आहे. रविवारी (दि. 27) दुपारी तीन ते सोमवारी (दि. 28) सकाळी नऊ या कालावधीत दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या ऑफिसच्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या उघड्या खिडकीवाटे ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसमधील तिजोरी व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 526 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.