विजयासाठी न्यूझीलंडचे जोरदार प्रयत्न

0
340

मौंट मौनगनुई, दि.२९ (पीसीबी) : गोलंदाजांच्या भरीव कामिगरीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर आपले पूर्ण वर्चस्व राखले आहे. विजयासाठी ३७३ धावांचे आव्हान ठेवल्यावर चौथ्या दिवस अखेरीस त्यांनी पाकिस्तानला ३ बाद ७१ असे अडचणीत आणले होते. चौथ्या दिवशी न्यूझीलंडने वेगवान फलंदाजी करून ५ बाद १८० धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला. पाकिस्तानने त्यानंतर विजयासाठी ३७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिवस अखेरीस ३ बाद ७१ अशी मजल मारली होती. फवाद आलम २१, तर अझर अली ३४ धावांवर खेळत होता. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने आज कारकिर्दीमधील ३०० बळींचा टप्पा गाठला.

पाकिस्तानसमोर कठिण आव्हान ठेवल्यावर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी नव्या चेंडूचा चांगला वापर केला. येथील खेळपट्टीवर जुना चेंडू फारसा प्रभावित ठरत नाहीये. अशा वेळी नव्या चेंडूवर मिळणारे यश निर्णायक ठरणार होते. हे ओळखून न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी नव्या चेंडूवर केलेला मारा तसाच भेदक होता. खेळपट्टीवर अचानक उसळणाऱ्या आणि खाली राहणाऱ्या चेंडूंमुळे फलंदाजांची कसोटी लागत आहे. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. अशा वेळी फवाद आलम आणि अझर अली यांनी अखेरची वीस षटके धीराने खेळून काढली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलला बाद करताना कारकिर्दीमध्ये तीनशे बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा साऊदी न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली, डॅनिएल व्हिटोरी यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मिळालेले यश लक्षात घेता सकाळी पाकिस्तानी गोलंदाज मात्र अपयशी ठरले. त्यांना न्यूझीलंडच्या सलामीचा जोडीवर अंकुश ठेवण्यात अपयश आले. टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेल यांनी आक्रमक फलंदाजी करून न्यूझीलंडचे मनसुबे स्पष्ट केले. या जोडीने १११ धावांची सलामी दिली. लॅथम (५३), ब्लंडेल (६४) बाद झाल्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वेगवान खेळण्यावरच भर दिला. मात्र, या नादात त्यांनी विकेट गमावल्या. उर्वरित खेळाचा विचार करून त्यांनी ३७२ धावांच्या आघाडीवर ५ बाद १८० धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. पाकिस्तानच्या नईम शाहने ३ गडी बाद केले.