फडणवीस यांनी अपवाद म्हणून भाजप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगून ‘माणदेश’च्या या वाघाचा पुरवला हट्ट

0
524

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ‘विधान परिषद निवडणुकीत मी भाजपच्या तिकिटावर उभा राहणार नाही, पडलो तरी चालेल’, अशी अग्रही भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शेवटपर्यंत ठेवली. तसेच जानकर यांनी आपला तिकिटाचा हेका काही सोडला नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपवाद म्हणून भाजप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगून ‘माणदेश’च्या या वाघाचा हट्ट पुरवला.

मागच्या लाेकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांचा बारामतीतून पराभव झाला. त्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर आले. या वेळी मात्र त्यांनी भाजपचे तिकीट नाकारले. स्वत: संस्थापक असलेल्या रासप या पक्षाच्या तिकिटावर भाजपला न जुमानता अर्ज दाखलही केला. जानकर यांचा विधानसभेत फक्त एक आमदार आहे. परिषदेवर निवडून येण्यासाठी २७ आमदारांची मते लागतात. ‘पाठिंबा भाजपचा घेताय, तर तिकीटही भाजपचे घ्या’, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका होती. पण, शेवटपर्यंत जानकर बधले नाहीत. त्यांनी ‘रासप’च्या एबी फाॅर्मवरच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने जानकर यांना इंगा दाखवण्यासाठी, दबाव वाढवण्यासाठी पृथ्वीराज देशमुखांच्या रूपाने १२ वा उमेदवार दिला. तरी जानकर यांनी हट्ट सोडला नाही. शेवटच्या दिवशी भाजपनेच माघार घेतली आणि आपला १२ व्या उमेदवाराचा अर्ज सपशेल मागे घेत निवडणुका बिनविरोध केल्या.