अंधश्रध्दा दूर करण्यासाठी स्मशानभूमीत साजरा केला लग्नाचा वाढदिवस

0
652

कलबुर्गी, दि.१० (पीसीबी) – अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका दाम्पत्याने अनोखी शक्कल लढवली. या दाम्पत्याने लग्नाचा १८वा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. या जगावेगळ्या सोहळ्याला त्यांचे सगे-सोयरे आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीसाठी नंदीकूर गावातील अनिता आणि पवन कुमार या दाम्पत्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी स्मशानभूमीत लग्नाचा वाढदिवस साजरा करून अंधश्रद्धेला थारा देणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला.

अनिता यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांचे पती पवन कुमार वालाकेरी हे सामाजिक कार्यकर्ते असून ते अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीचे काम करतात. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, तसेच स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी आम्ही या ठिकाणी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे पवनकुमार आणि अनिता यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘स्मशानभूमीत लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावांतील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय एका खासगी रुग्णालयात रक्तदान केले. त्यावेळी अन्य ३० व्यक्तींनीही रक्तदान केले,’ अशी माहिती अनिता यांनी दिली.