प्लॅस्टरच्या गणेश मूर्तीचे काय होणार ?

0
580

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ (CPCB) ने गणेश मूर्तींसंदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत, ज्याचा फटकाही मूर्तीकारांना बसू शकतो. नव्या निर्देशांनुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. देशभर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात गणेशोत्सवात ८०-८५ टक्के प्लॅस्टरच्या मुर्त्या असतात. अवघ्या तीन महिन्यांवर गणेशोत्सव असल्याने पुढे काय, हा गहन प्रश्न उभा आहे. त्यातच कोरोनामुळे शाडु माती उपलब्ध होत नाही आणि पावसाळा तोंडावर असल्याने मुर्तीकारांचे काम अडून बसले आहे. ज्यांनी प्लॅस्टर च्या मुर्ती बनविल्या आहेत त्यांचे मोठे नुकसान संभवते. आता राज्य सरकार काय भूमिका घेते त्यावर पुढची परिस्थिती अवलंबून आहे.

गणेशोत्सव यंदा २२ ऑगस्टला आहे. मुर्तीकारांचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुर्तींवर अखेरचा हात फिरवणे बाकी आहे. अशातच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती नकोत, असे आदेश आल्याने मुर्तीकारांचे प्रचंड मोठे नुकसान संभवते. पर्याय म्हणून अवघ्या तीन महिन्यांत शाडु मातीच्या मुर्ती बनविणे हे अशक्य आहे. मुख्यतः सार्वजनिक मंडळाच्या उंच मोठ्या मुर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्येच बनविल्या जातात. काही मंडळे सहा महिने अगोदरच बुकिंग करतात, आता त्यांचीही कुचंबना होणार आहे. महाराष्ट्रात साधारणतः तीन कोटी मुर्ती बसविल्या जातात. त्यापैकी लहान मोठ्या मिळून किमान ७० टक्के मुर्ती प्लॅस्टरच्या असतात. शाडुच्या मुर्ती महाग पडतात म्हणून ९० टक्के मुर्तीकार आता प्लॅस्टरच्या मुर्ती बनवितात. प्लॅस्टर पाण्यात विरघळत नाही, त्यातून जलप्रदुषण वाढते अशा असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत प्लॅस्टरवर बंदी घालण्यात आली आहे.
पेण, अहमदनगर, पुणे शहरात गणेश मुर्तींचे मोठे कारखाने आहेत ते मुर्तीकार आता संभ्रमात आहेत. पेण शहराच्या आसपासच्या गावांत शाडुमुर्तीच्या कार्यशाळा आहेत. तिथे घडविल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. तिथल्या गल्ली गल्लीत छोट्या मोठ्या मिळून सुमारे साडेचारशे मूर्तीशाळा किंवा कारखाने आहेत. गणेशोत्सवाला अवकाश असला, तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम पेणमध्ये जवळपास वर्षभर चालतं. सहा इंचांपासून ते काही फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती इथे बनवल्या जातात. तालुक्यातले जवळपास दोन लाख जण या व्यवसायात आहेत. पण कोरोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, यंदा गणेशोत्सवावरच परिणाम होईल, अशी चिन्ह आहेत. यातून कसं सावरायचं असा प्रश्न पडलेला असतानाच प्रदुषण नियंत्रण मंडळाचा हा नवा आदेश आल्याने नेमके काय करायचे असा प्रश्न सर्वच मुर्तीकारांना पडला आहे.
पेणच्या गणेशमूर्तींना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांबरोबरच राज्याबाहेरूनही मोठी मागणी असते. इंग्लंड, अमेरिका, मॉरिशससारख्या देशांमध्येही या मूर्तींची निर्यात होते. साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या काळात निर्यात होणाऱ्या मूर्ती पाठवाव्या लागतात. पुढच्या परवानग्या आणि व्यवहार पूर्ण होऊन मगच मूर्ती गणेशोत्सवासाठी परदेशात पाठविली जाते. आता ते व्यवहारसुध्दा अडचणीत सापडले आहेत. यंदा मार्चमध्येच कोरोनाचा लॉकडाऊन झाला. जगभरातच हे संकट आहे, साहजिकच तिथं यंदा मूर्ती घेणारंही कुणी नाही. त्यामुळं अजिबातच निर्यात होऊ शकलेली नाही, अशी माहिती मुर्तीकारांनी दिली.

राज्यातील मुख्य बाजारपेठ ही पुणे आणि मुंबईत आहे. तसं नाशिक, नागपूरलाही इथून मोठ्या प्रमाणात मूर्ती पाठवल्या जातात. यातला बराच भाग आता कोरोनाच्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळं पुढेही विक्री कशी आणि किती होईल हा प्रश्न आहेच, असा प्रश्न मुर्तीकाराने केला आहे. पेणमध्ये आधीच पीओपीच्या मूर्ती तयार आहेत. त्यांचे काय होणार हा प्रश्न आहे. यंदा त्यातून सवलत मिळावी, अशी अपेक्षा मूर्तीकार व्यक्त करत आहेत.
बहुतेक कारखानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी व्यवसायात ओततात. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर पाच लाख ते पन्नास लाखांपर्यंतचं कर्ज आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुरानं काही कारखानदारांना आधीच नुकसान झालं होतं. त्यातून सावरतात तो हे संकट उभं राहिलं आहे. मुर्तीकारांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशीही मागणी मुर्तीकारांनी केली आहे. किमान यापुढे सार्वजनिक गणेश मडळांनी वर्गणी घेऊ नये, प्लॅस्टर ऐवजी आणि मर्यादीत उंचीच्या मूर्तींची स्थापना करावी, शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, कमीत कमी कार्यकर्ते सहभागी व्हावेत, अशाही सूचना पुढे आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांना विचारणा केली असता ते म्हणाले, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून गाईडलाईन आल्या आह