प्रेमप्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगण्याची भीती घालून एक लाख उकळले

0
643

वाकड, दि. ९ (पीसीबी) – एका तरुणाने तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या घरी सांगण्याची धमकी देऊन तरुणीकडून वेळोवेळी एक लाख रुपये घेतले. तरुणीने प्रेमसंबंध तोडल्यानंतर पुन्हा तिचा पाठलाग करून तिच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार दोन वर्षांपासून २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे घडला.

याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक विठ्ठल लिंडयात (रा. तामसवाडी, ता. पारुळा, जि. जळगाव. सध्या रा. इंदिरानगर, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे सात वर्षांपासून मैत्री व प्रेमसंबंध होते. आरोपीने या प्रेमसंबंधाबाबत फिर्यादीच्या घरच्यांना सांगण्याची भीती घालून वेळोवेळी एक लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. आरोपीने फिर्यादी यांना मानसिक त्रास दिला. त्याच्यासोबत मैत्रीचे व प्रेमसंबंध तोडून पुन्हा संपर्क करण्यास फिर्यादी यांनी आरोपीला मनाई केली.

त्यांनतर देखील आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीच्या व फिर्यादी यांच्या बहिणीच्या मोबाईलवरफोन करून पाठलाग केला. फिर्यादी यांनी नकार दिला असता शिवीगाळ करून धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी करून मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.