प्राधिकऱणाचे सीओ बन्सी गवळी यांची तडकाफडकी बदली – २००० कोटी रुपयांचे `ते` भूखंड प्रकरण अंगलट आले, नगरसेविका सिमाताई सावळे यांनी केली होती चौकशीची मागणी

0
588

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – सहा महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या बन्सी गवळी यांची आज तडकाफडकी बदली कऱण्यात आली. अमारावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर बढतीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, `मी आताच आलो आणि लगेचच बदली का करता`, असे म्हणत बदली रद्द करण्याचा आटापीटा गवळी यांनी चालवला असून दिवसभर ते मंत्रालयात तळ ठोकून असल्याचे समजले. वाकड येथील सुमारे २००० कोटी रुपये किंमतीच्या अत्यंत मोक्याच्या अशा ४०-५० एकराचा भूखंड मुंबईतील एका मोठ्या बिल्डरच्या घशात घालण्याचे मोठे कारस्थान प्राधिकरणात शिजत होते. त्याचा भंडाफोड पीसीबी टुडे ने केला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेतील जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची आणि कारवाईची मागणी लावून धरली होती.

प्राधिकरण सीओ म्हणून गवळी यांची खास नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रमोद यादव यांची अवघ्या वर्षभरात बदली करून त्यांच्या जागेवर गवळी यांची नियुक्ती करण्यामागे वादग्रस्त भूखंड व्यवहार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. राज्य मंत्रीमंडळातील बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याने गवळी हे निश्चिंत होते, मात्र जमीन प्रकरण बन्सी गवळी यांनी व्यवस्थित हाताळता आले नाही. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा शहरात आहे.

दरम्यान, बन्सी गवळी यांना मोबाईलवर संपर्क केला असता, ते उपलब्ध झाले नाही.