प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे एक कोटींची खंडणी मागणारा अटकेत

0
220

पुणे, दि.  १० (पीसीबी) – प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने धमकावण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना धमकीचा ई-मेल पाठवून मजकुरात राज्य घटनेचा अवमान केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी सचिन काशीनाथ गव्हाणे (रा. राजगुरूनगर) याच्यासह त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गव्हाणेला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सचिन गव्हाणेचा भाऊ समीरने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड येथे अर्ज केला होता. त्याने सचिनच्या नावाने सही करून कागदपत्रे सादर केली होती. सचिनच्या नावावर असलेला ट्रक त्याने विशाल टाव्हरे याच्या नावावर करुन दिला होता. त्यानंतर सचिनने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात समीर गव्हाणे तसेच तत्कालीन सहायक परिवहन अधिकारी सुबोध मिर्चीकर, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन परिवहन आयुक्तांच्या मुंबई कार्यालयात दोषारोपपत्र पाठविण्यास परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता.

संबंधित प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यानंतर आरोपी सचिनने वेगवेगळ्या कार्यालयात तक्रार अर्ज पाठविण्यास सुरुवात केली. परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी मिळाली, यासाठी त्याने इमेल पाठविले होते. गेल्या वर्षी तो प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी अजित शिंदे यांच्या कार्यालयात गेला. मी तक्रारी करणे बंद करतो. तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक कोटी रुपये गोळा करुन द्यावेत, अशी मागणी केली, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सुरुवातीला शिंदे यांनी गव्हाणेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गव्हाणे तडजोडीत ८५ लाख रुपये देण्याची मागणी केली. शिंदे यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर एक जून रोजी एक इमेल शिंदे तसेच अन्य शासकीय कार्यालयात पाठविला. त्यात त्याने राज्य घटनेविषयी अवमानकारक उल्लेख केला. ई-मेलमध्ये शिंदे यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर लिहिला होता. शिंदे यांनी त्याच्या विरोधात नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.