“प्रत्येक प्रयोग नवीन गोष्ट शिकवतो”; विराटकडून इस्रोचे कौतुक

0
411

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा थोडासा हिरमोड झाला. पण इस्रोच्या प्रयोगाचे आणि प्रयत्नांचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांच्यापाठोपाठ भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही इस्रो च्या कामगिरीचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम केला.

“विज्ञानात अपयश वगैरे काहीही नसते. जेवढे अधिक प्रयोग केले जातात, तेवढे नवे आणि ज्ञानात भर पाडणारे अनुभवच मिळतात. इस्रो च्या शास्त्रज्ञांनी दिवसाची रात्र करून अविरत प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल मनात नितांत आदर आहे. संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे. जय हिंद!”, अशा शब्दात विराटने चांद्रयान – २ मोहिमेची स्तुती केली.

या आधी “स्वप्न जरी अपूर्ण राहिले असेल तरी आपण खचून जायचं नाही. आपल्यातील आशावाद कायम जिवंत ठेवला पाहिजे. आपण नक्कीच यशस्वी होऊ”, असे ट्विट करत सेहवागनेही इस्रो च्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच भाजपा खासदार गौतम गंभीरनेही इस्रो दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.