काँग्रेसचे ५७, राष्ट्रवादीचे ७० उमेदवार निश्चित

0
550

मुंबई, दि.७ (पीसीबी) – विधानसभेसाठी काँग्रेसने ५७ तर राष्ट्रवादीने जवळपास ७० उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेसच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींचा समावेश असून, राष्ट्रवादीने जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले.

काँग्रेस छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील ५७ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये विद्यमान ३० आमदारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते के. सी. पाडवी, कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे.

१० तारखेला छाननी समितीची पुन्हा बैठक होत असून, त्यात आणखी ३० ते ४० उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीकडून मंजुरी मिळाल्यावरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल.

पक्षाने बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत २१६ जागांबाबत एकमत झाले आहे. यामध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला १११ तर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला १०५ जागा आल्या आहेत. उर्वरित जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. यातच मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. शेकापला किती जागा सोडायच्या यावर एकमत झाले आहे. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचे कवाडे, गवई गट आदींशी सध्या चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीचीही नावे निश्चित

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवारी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीत जवळपास ७० उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आदींचा समावेश आहे. काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीने पक्षात कायम राहिलेल्या बहुतांशी सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत काँग्रेस २९, राष्ट्रवादी ७ जागा लढविणार?

मुंबई  विधानसभा निवडणुकीचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. मुंबईतील जागा कुणी, किती लढवायच्या याचे सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार काँग्रेसने २९ व राष्ट्रवादीने ७ जागा लढवाव्यात असा तोडगा पुढे आला असून, त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी त्याला दुजोरा दिला.

निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे, असे काँग्रेस नेत्यांचे मत होते. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. परंतु त्यात यश मिळत नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.  आता वंचित आघाडीशिवाय अन्य समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची काँग्रेसने तयारी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यस्तरावर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये २०० जागांवर एकमत झाले आहे. आणखी ५० जागांवर चर्चा होऊन त्यावरही तोडगा निघेल. उरलेल्या ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.  दरम्यान, मुंबई शहर व उपनगरांत ३६ जागा आहेत. त्यांपैकी काँग्रेस २९ व राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागा लढवाव्यात असा तोडगा पुढे आला आहे.

गायकवाड हंगामी अध्यक्ष

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. मात्र त्यांच्या जोडीला  एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता देवरा यांच्या जागी गायकवाड यांची मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.