पंढरपूर; चंद्रभागा तीरावरची मंदिरे पाण्याखाली

0
801

पंढरपूर, दि.७ (पीसीबी) – भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसामुळे महिन्यात दुसऱ्यांदा पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीत पोहोचले. त्यामुळे वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून पालिकेने खबरदारीच्या उपाय योजना केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जरी समाधानकारक पाउस झाला नसला तरी जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले उजनी धरण मात्र काठोकाठ भरले आहे. पुण्यातील भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले आहे.  गेल्या महिन्यात पंढरपूर येथे पूर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता भीमा नदी दुथडी भरून वाहात आहे. वीर धरणातून ३२ हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यात आले. हे पाणी अकलूज जवळील नीरा नृसिंहपूर येथून पुढे भीमा नदीला जाते. तर दुसरीकडून उजनी धरणातून जवळपास ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.  हे पाणी देखील पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रात पोहोचले आहे. त्यामुळे वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नदीतीरावर बोटी तसेच लाईफ गार्ड्स तैनात केले आहेत. जरी पाणी वाढले तरी नदीकाठच्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन केल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे. दरम्यान, भीमा आणि नीरा खोऱ्यात पाऊस थांबला असल्याने तेथून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.