प्रति चौरस फूट १ रुपये दंड आकारून अनधिकृत बांधकामे अधिकृत करा – प्रशांत शितोळे

0
683

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारे शास्तीकर १०० टक्के माफ करण्यात यावे. तसेच प्रति चौरस फूट एक रुपये दंड आकारून अनधिकृत बांधकामे अधिकृत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात प्रशांत शितोळे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सरकारने अनधिकृत बांधकामांना किती शास्तीकर आकारायचा, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी महापालिकांना दिले आहेत. या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आले, तरी पिंपरी-चिंचवडमधील एकही अनधिकृत बांधकाम नियमित झालेले नाही. केवळ अर्ज दाखल होणे म्हणजे नियमितीकरण नाही, त्यासाठीचे नकाशे, मोजणी, दंड भरलेची पावती, नियमितीकरण दाखला या कोणत्याच गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे अनाधिकृत बांधकामांसाठीची नियमावली फसवी होती, हे सिद्ध झाले. दुसरीकडे शास्तीकर भरल्यास बांधकाम नियमित होणार असा चुकीचा समज निर्माण केला गेला. उलट शास्तीकर माफी झाल्यानंतरही अनाधिकृत बांधकामांची टांगती तलवार नागरिकांवर तशीच राहणार आहे.

मुख्यमंत्री शास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला देणार असतील, तर अनाधिकृत बांधकामे नियमितीकरण करण्याचे अधिकारही महापालिकेला देणे गरजेचे आहे. महापालिकेने शहरातील अनाधिकृत व विनापरवाना बांधकामधारकांकडून प्रति चौरस फूट १ रुपये दंड आकारून सर्व बांधकामे नियमित करावीत. शहरातील लाखो घरांचा व कुटुंबांचा प्रश्न अनेक वर्षे ऐरणीवर आहे. त्यास कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भाजपासह सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.”