पोलीस हतबल, गेल्या महिन्याभरात 123 वाहने चोरीला

0
452

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहन चोरटे पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण करीत आहेत. मागील महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील केवळ 16 वाहनांचा पोलिसांना शोध लागला आहे. तर मागील नऊ महिन्यात शहरातून 627 वाहने चोरीला गेली असून त्यातील 95 वाहने पोलिसांना मिळाली आहेत. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आगमानानंतर वाहन चोरांचा सुळसुळाट अधिक वाढला आहे. या वाहन चोरांपुढे पोलीस हतबल आहेत, असे दिसले.

जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 या तीन महिन्यांमध्ये 178 दुचाकी, 6 तीनचाकी आणि 16 चारचाकी वाहने चोरीला गेली. सप्टेंबर महिन्यात वाहन चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला. वाहनचोरीच्या घटनांमध्ये मागील महिन्यात वाढ झाली. एका महिन्यात तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये 108 दुचाकी, एक तीनचाकी आणि 16 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या केवळ 16 दुचाकी वाहनांचा शोध लागला आहे.

जानेवारी ते सप्टेंबर 2020 या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरातून 627 वाहने चोरीला गेली आहेत. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 या नऊ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 20 वाहने चोरीला गेली होती. तर त्यातील 224 वाहनांचा शोध लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत अतिशय कमी आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी ‘वाहन चोरी विरोधी पथक’ या विशेष पथकाची निर्मिती केली होती. या पथकात सात कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी होते. मात्र, कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहन चोरी विरोधी पथकासह अन्य विशेष पथके बरखास्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची मोठी व्याप्ती आणि त्या प्रमाणात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता.

वाहन चोरी विरोधी पथकांनी अनेक किचकट गुन्ह्यांचा उलगडा केला होता. परराज्यातून देखील चोरीची वाहने या पथकाने जप्त केली होती. ऑगस्ट महिन्यात वाहन चोरीच्या वाढलेल्या गुन्ह्यांमुळे या पथकाची पुन्हा एकदा गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.