पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटके सापडल्याने खळबळ

0
449

कल्याण, दि. २९ (पीसीबी) – कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासह तीन महत्वाची शासकीय कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारात एका रिक्षामध्ये स्फोटके सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर एका रिक्षात स्फोटके ठेवण्यात आल्याच्या निनावी चिठ्ठी कल्याण पोलिसांना मिळाली होती. या चिठ्ठीची गंभीर दखल घेत त्या रिक्षाचा शोध सुरु करण्यात आला. तत्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले त्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यलयाच्या आवारातच एका रिक्षात चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या इमारतीच्या तळ मजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यलय, पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यलय, दुसऱ्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे. अशा महत्वाच्या इमारतीच्या आवारातच स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ती स्फोटके जप्त केली आहेत.

दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावात राहणाऱ्या तीन शेतकरी महिला जमिनीच्या वादप्रकरणी प्रांत कार्यलयात आल्या होत्या. या महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या त्याच रिक्षात ही स्फोटके आढळली आहेत. त्यामुळे या महिलांनी रिक्षा चालकाला फसविण्यासाठी ही स्फोटके रिक्षात ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खडकपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.