पोलीस उपनिरीक्षक नितेश देशमुख यांचे निधन

0
374

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – लातूर जिल्ह्यातील बाबूळगावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक नितेश देशमुख हे मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नितेश देशमुख यांनी पत्नी आणि दीड वर्षीय मुलीला मूळगावी सोडलं होतं. दरम्यान, कोरोना संकट काळात कर्तव्य बजावत असताना नितेश देशमुख यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे 12 जुलै रोजी ते कांदिवली परिसरातील खाजगी नम: रुग्णालयात दाखल झाले.

उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि पहाटे 1.52 वाजता नितेश देशमुख यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. नितेश देशमुख यांच्या मृत्यूची बातमी समजताच बांगुर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांसह त्यांच्या बॅचमधील मित्रमंडळी हादरले. अतिशय गुणवान व्यक्तीमत्व असलेले नितेश देशमुख यांचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे. मृत्युपूर्वी नितेश देशमुख यांची कोव्हिड-19 ची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. त्यामुळे नितेश देशमुख यांचा मृतदेह सध्या शताब्दी रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे.