#UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये – रोहित पवार

0
209

महाराष्ट्र,दि.१७(पीसीबी) – कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट पोस्ट केलं आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही राज्यातील परिस्थिती दिलासादायक नाही. करोनाचा प्रसार झपाट्यानं होत असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची विनंती युजीसीकडे करण्यात आली आहे. दरम्यान, याच विषयावर रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत. “करोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या युजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोजी आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न युजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा”, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर युजीसीनं परीक्षा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यासंबंधात नवीन मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका वारंवार जाहीर केली जात असून, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयालाही पत्र पाठवलं आहे.