कोरोना रुग्णांच्या सोयिसाठी लॉजेस, शाळा, महाविद्यालये ताब्यात घ्या – मंगलाताई कदम यांची मागणी

0
451

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर ९,२३९ सकारात्मक कोरोना बाधित असून सुमारे ३,२३५ कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज चारशे पाचशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून २० ते २५ हजार होईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी व खाजगी रुग्णालयाची कोरोना बाधित रुग्ण ठेवण्याची क्षमता आताच संपलेली आहे. त्यामुळे येथून पुढे कोरोना बाधित रुग्णांसाठी शहरात खाजगी अथवा सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाही. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये घबराट होऊन मानसिकदृष्टया त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शहरातील मोठी हॉटेल, लॉज खाजगी शैक्षणिक संस्थाची हॉस्टेल, मनपाच्या मिळकती आदी तातडीने ताब्यात घेऊन तिथे मुलभूत सुविधा उपलब्ध करुन त्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या जेष्ठ नगरसेविका मंगलाताई अशोक कदम यांनी केली आहे.

महापालिका आयुक् श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदानात त्या म्हणतात, शहरात ब-याच खाजगी विकसकांनी गृह निर्माण सुंकले तयार केली आहेत, परंतु ती अदयाप तशीच आहेत. ती संकुले सुध्दा मनपा रास्त दरात भाड्याने घेऊन तिथे कोरोनाबाधित रुग्णांची सोय करता येईल. अशा विविध प्रकारचे उपाय कोरोना बाधितांसाठी आता पासूनच करणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यामध्ये या रुग्णांना ठेवणे अवघड होईल त्यामुळे आता पासूनच कृतीशील आराखडा तयार करुन या रुग्णांसाठी जय्यत तयारी मनपा प्रशासनास करावी लागेल. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी मनपा मार्फत कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व कोरोना झाल्यास न घाबरता कसे उपचार घेता येतील याबाबत नागरीकांचे समुदेशन करणे आवश्यक आहे. मानसिकदृष्टया नागरीकांना सक्षम बनविणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या सारथी हेल्पलाईनवरुन समुदेशन करता आल्यास नागरीक कोरोनांस न घाबरता योग्य ती काळजी घेतील.

मनपाच्या मिळकतीमध्ये जिथे कोरोना बाधित रुग्ण ठेवणे शक्य आहे तिथे मुलभूत सोई सुविधा उपलब्ध करुन तसेच इतर खाजगी मिळकतीबाबत सर्वकष आराखडा तयार करुन कोरोना बाधितांसाठी त्वरीत पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. व सारथी हेल्पलाईनवरुन कोरोनाबाबत समुदेशन करण्यात यावे, असे सौ. मंगलाताई अशोक कदम यांनी सुचविले आहे.