पैसे बुडवले मालकाने, शिक्षा कामगारांना; नग्न करत बांबू, झाडू, हाताने केली मारहाण

0
836

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुण्यात कामगारांना नग्न करून रात्रभर मारहाण करत नाचवले. मालकाने पैसे बुडवल्याच्या रागातून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने खोलीत डांबून त्यांना नग्न करत बांबू, झाडू, हाताने, मारत रात्रभर नाचवले. जोपर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत असेच सूर राहणार, असे म्हणत टोळक्याने त्यांना मच्छर मारायच्या बॅटने करंट दिला.

मालकाने पैसे बुडवल्याच्या रागातून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने खोलीत डांबून त्यांना नग्न करत बांबू, झाडू, हाताने, मारत रात्रभर नाचवले. जोपर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत असेच सूर राहणार, असे म्हणत टोळक्याने त्यांना मच्छर मारायच्या बॅटने करंट दिला. रात्रभर मारत नाचवले. या छळापासून वाचण्यासाठी इमारतीवरून उडी मारून पळून जात असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगार गुफरान जाऊद्दीन खान याने छळणूक करणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गुफरान जाऊद्दीन खान (वय १९) रा. त्रिमूर्ती चौक आंबेगाव पठार) हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. मागील ३ महिन्यांपासून तो कामानिमित्त नातेवाईकाकडे आला आहे. त्याच्या नातेवाईकाने फिर्यादी खान याला करीम खान यांच्या नुराणी केटरर्स, आंबेगाव पठार, त्रिमूर्ती चौक येथे बिर्याणी बनवण्यासाठी कामाला लावले होते. तेव्हापासून तो येथे काम करत आहे. कामावरील फिर्यादीचा सहकारी लाल मोहम्मद खान हे दोघे केटरिंगच्या गाळ्यातच झोपायचे, तर त्यांचे मालक करीम खान त्यांच्या कुटुंबासोबत गाळा असलेल्या बिल्डिंगमध्ये राहतात. लाल महम्मद खान याने स्वतःचे बिर्याणीचे दुकान टाकलेले होते. तो अधून-मधून येथील दुकानावर येऊन काम करत असे.

९ ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादीचे शेठ करीम खान यांनी त्याला सांगितले की, मी पैशांच्या कामासाठी मुंबईला चाललो आहे. उद्या सकाळी परत येईन. कोणी मला विचारले तर शेठ मुंबईला गेल्याचे सांग. त्यादिवशी दिवसभर फिर्यादीने बिर्याणी विकली. रात्री ११ च्या दरम्यान राकेश खोपडे फिर्यादीकडे आला. त्याने विचारले की, तुम्हारा शेठ किधर है. त्यावर करीम शेठ मुंबई को गये है. कल सुबह आ जायेंगे, असे सांगितले. त्यावर राकेश म्हणाला की, तुमचा शेठ पळून गेला आहे, तो माझे ३ लाख ५० हजार रुपये देणार होता. जोपर्यंत पैसे देत नाही. तोपर्यंत तुला आणि लाल मोहम्मद दोघांनाही माझ्या सोबत राहावे लागेल. तो दोघांना सोबत घेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये गेला.

तेथे पुन्हा राकेशच्या मुलांनी, तेरा शेठ हमारा पैसा कब देनेवाला है, असे विचारले. फिर्यादीने त्यांना सांगितले की, आम्ही दोघे फक्त कामगार आहोत. काम करून पोट भरण्यासाठी येथे आलोय. आम्हाला तुमच्या प्रकरणात का ओढता आहात? त्यावर राकेश खोपडे व त्याच्या मुलांनी दोघांना बेदम मारहाण केली. एका बिल्डिंगमध्ये ते त्यांना घेऊन गेले. तेथे दोघांचे फोन काढून घेतले. बाहेरून खोली बंद केली. काही वेळाने पुन्हा खोली उघडली तेथे सात-आठ लोक आले होते. ते खोलीत येऊन आतून त्यांनी खोली बंद केली.

राकेश खोपडेच्या एका मुलाने फिर्यादी खान याला कोपऱ्यात बसायला सांगितले. घाबरून तो भीतीने थरथरत कोपऱ्यात बसला. आलेल्या आठ जणांपैकी एकाने लाल मोहम्मदला त्याचे कपडे काढण्यास सांगितले. त्यावर लालने कपडे काढण्यास नकार दिला. त्यावर त्याला बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले. लालने कपडे काढल्यानंतर टोळक्याने मोबाईलवर गाणे लावले आणि त्याला बांबूने, हाताने, झाडूने मारहाण करत नाचायला लावले. त्यावेळी मच्छर मारायच्या बॅटने करंटही दिला.

या सगळ्या प्रकारात फिर्यादी खानचा भीतीने थरकाप उडाला. त्यावर त्यालाही कपडे उतरून नाचायला सांगितले. त्याला त्यांनी हातावर, पायावर झाडूने, बांबूने मारहाण केली. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाहीत तोपर्यंत असेच चालेल असे ते टोळके दोघांना म्हणत होते. पहाटे ६ पर्यंत त्यांनी दोघांना फक्त चड्डीवर ठेवून मारहाण केली. सकाळी राकेश खोपडेच्या मुलाने लालला त्याचा मोबाईल देऊन करीम खानला फोन करायला सांगितले आणि साडेनऊपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर दोघांना ठार मारू असे करीमला सांगण्यास सांगितले.

या छळाला कंटाळून आणि अधिक मारहाण टाळण्यासाठी लाल पळून जात असताना त्याने दरवाजाची कडी उघडून खाली उडी मारली, त्यात त्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी खान याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.