पैसे देत नाही म्हणून ‘त्याने’ केला वरवंटा, हातोडी, चाकूने मारून पत्नीवर खुनी हल्ला

0
197

तळेगाव स्टेशन, दि. १८ (पीसीबी) – पत्नीने पैसे दिले नाहीत, या कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा, हातोडी आणि चाकूने मारून तिच्यावर खुनी हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 17) सायंकाळी सिद्धार्थ नगर, तळेगाव स्टेशन येथे घडली.

मनीषा शंकर कोरडे (वय 40, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पती शंकर बबन कोरडे (वय 43) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मनीषा यांनी आरोपी पती शंकर याला पैसे दिले नाहीत. त्यावरून आणि घरगुती अन्य कारणांवरून दोघांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भांडण झाले. चिढलेल्या आरोपी शंकर याने पत्नी मनीषा यांचा खून करण्याच्या उद्देशाने घरातील दगडी वरवंटा, हातोडी आणि चाकूने मारहाण केली. यात मनीषा यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी पती शंकर याला अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.