पेट्रोल ओतून गॅरेज जाळले, त्यानंतर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा वाद अन पोलिसाला धक्काबुक्की, पाच जणांना अटक

0
282

निगडी, दि. १० (पीसीबी) – किरकोळ भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यक्तीचे गॅरेज पेट्रोल ओतून जाळले. त्यांनतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी निगडी पोलीस ठाण्यात आले. तिथे आल्यानंतर दोन्ही गटात पोलीस ठाण्यातच जुंपली. हा वाद सोडवत असताना पोलिसांनी मध्यस्थी केली असता दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

फिरोज आयुब खान (वय 35, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चांद इस्माईल मुकरताल, हैदर मौला शेख, साजिद रज्जाक मुकरताल, मुजाहिद रज्जाक मुकरताल, इब्राहीम राजेसाहेब मुकरताल, सादिल आदिल अन्सारी (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी फिरोज यांचा भाऊ इमरान खान आणि मित्र राजू शेख यांच्यासोबत आरोपींचे भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी फिर्यादी यांच्या गॅरेजवर आले. त्यांनी गॅरेजवर पेट्रोल ओतून गॅरेज पेटवून दिले. त्यात 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर फिरोज खान आणि आरोपी यांच्यात वाद झाला.

हा वाद निगडी पोलीस ठाण्यात पोहोचला. निगडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील लोक एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. पोलिसांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस अंमलदार अजित गोंदके यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार गोंदके यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली.

त्यानुसार अरशद आयुब खान, बंदेअली अख्तरअली सय्यद (वय 33), आक्रम नफीस शेख (वय 34), शाहरुख सलाउद्दीन शेख (वय 30), फिरोज आयुब खान (वय 35), गौस सय्यद, नियामत शेख, अली सय्यद, इम्तियाज खान, हमीद इम्रान, आलम खान, रिजवान बागवान, इमरान आयुब खान, राजा आसिफ शेख, मोहम्मदसाद अब्दुला शेख (वय 25, सर्व रा. ओटास्कीम निगडी) आणि अन्य 10 ते 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंदेअली अख्तरअली सय्यद, आक्रम नफीस शेख, शाहरुख सलाउद्दीन शेख, फिरोज आयुब खान, मोहम्मदसाद अब्दुला शेख या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. निगडी
पोलीस तपास करीत आहेत.