पेट्रोलपंप परवानगीसाठी पैशाची देवाण घेवाण करणारा महापालिकेतील ‘तो’ पदाधिकारी कोण ?

0
516

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – भोसरी येथील पेट्रोल पंपाच्या परवानगीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महापालिकेतील अत्यंत वादग्रस्त पदाधिकाऱ्यात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार माहीत असल्याने माझ्या विरोधात अर्ज मागवला तसेच कार्यालयात बोलावून अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे. याबाबत संबंधित कर्मचारी महिलेने पोलीस आयुक्तांसह थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे लेखी तक्रार केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, महापालिकेतील तो पदाधिकारी कोण यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लाचखोरीचे प्रकरण अद्याप शमले नाही तोच हे नवे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने सत्ताधारी भाजपाची मोठी कोंडी झाली आहे.

महिलेने तक्रार अर्जात दिलेल्या माहितीनुसार,पोलिस आयुक्तालयात काम करत असताना वरिष्ठांच्या जवळ असणारे काही कर्मचारी प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडून महिन्याला ठराविक रकमेची वसुली केली जाते. तसेच वरिष्ठांसोबत सलोख्याचे संबंध असल्याने बदलीची भीती दाखवली जाते. अनेकदा वरिष्ठ दर्जाच्या महिलांचे ‘बॉडीशेमिंग’ अधील चाळे करून विनोद केले जातात. तसेच काही सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जातो. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अत्यंत महत्वाचा पदाधिकारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात पेट्रोल पंप परवान्यासाठी पैशाची देवणाघेवाण झाली. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस अधिकाऱ्याने संबंधित पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत कार्यालयात बोलवून अपमानास्पद वागणूक दिली. तसेच १ मार्च २०२१ रोजी पैशांची मागणी केल्याचा महिलेच्या विरोधातच अर्ज मागविल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तसेच कार्यालयातील एक कर्मचारी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार अंगावर घावून आला. याबाबतही त्यावेळी लेखी तक्रार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान कार्यालयीन राजकारणामुळे पुणे ग्रामीण किंवा संचालक पोलीस बिनतारी संदेश येथे बदली करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी महिलेने अर्जात केली आहे.

महापालिकेतील संबंधित पदाधिकाऱ्यावर नुकतीच एक मोठी पोलिस कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर प्रवास करत असताना काही व्यक्ती पाठलाग करतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे भासत असून माझ्याकडे संशयास्पदरित्या पाहतात. यामुळे जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे पत्र अर्जदार महिलेने पोलीस आयुक्तांना दिले आहे.