पुत्र प्रेमासाठी नेत्यांना झुकावे लागतेय – सुप्रिया सुळे     

0
451

ठाणे, दि. २९ (पीसीबी) – गेली ४०  वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असताना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट  आहे, असा निशाणा खासदार  सुप्रिया सुळे यांनी  पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.

खासदार सुळे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने ठाणे येथे आल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी  बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाजप कडून दबाव आणला जात आहे. कोणाची बॅंक घोटाळे, कारखाने, तर कोणाची चौकशी लावू म्हणून पक्षात घेतले जात आहे. पण हे मोठे दुर्दैव आहे. केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत.

परंतु, जात असताना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही वंशाच्या दिवा नसलो, तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.