पुण्यात सणासुदीच्या काळात साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

0
705

पुणे, दि. ११ (पीसीबी) – सणासुदीच्या काळात गुजरातहून मिठाई बनवण्यासाठी आणण्यात आलेला तब्बल साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१०) करण्यात आली.

याप्रकरणी आराम बसच्या चालकासह भेसळयुक्त खवा घेऊन आलेला भावेश पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन  दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पुणे गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव हे सहकारनगर, धनकवडी भागात गस्त घालत असताना पद्मावती येथे खासगी आराम बसमधून भेसळयुक्त खवा विक्रीसाठी पुण्यात पाठविण्यात आला असल्याची खात्रीशिर माहिती त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. यावर पद्मावती येथे खासगी आराम बसच्या थांब्याच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून गो-गंगा, भाग्यलक्ष्मी, वीरकृपा या खासगी प्रवासी वाहतूक बसची झडती घेतली असता बसमधून एकूण साडेतीन हजार किलो बनावट खवा जप्त करण्यात आला. पोलिसांनी आराम बसच्या चालकासह भेसळयुक्त खवा घेऊन आलेला भावेश पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन  दोघांनाही अटक केली आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी असते, यामुळे खव्याचा टुटवडा भासतो. तर बऱ्याचदा भेसळयुक्त खवा वापरुन मिठाई बनवल्या जातात आणि नागरिकांच्या जीवाशी खेळले जाते.