मराठा आरक्षणाबाबतचा प्रगती अहवाल उच्च न्यायालयात सादर  

0
651

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाकडून आज (मंगळवार) उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर करण्यात आला. तर अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. यामुळे प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा प्रगती अहवाल सादर करताना  येत्या चार आठवड्यात अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे न्यायालयाला  सांगितले. त्यामुळे न्यायालयाने येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाला दिले.

दरम्यान, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी  कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. यावर न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

मराठा आरक्षणसाठी गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाने मोठे मोर्चे काढून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्यावेळी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. तसेच काही तरूणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याही केल्या होत्या. याची न्यायालयाने दखल घेतली होती.