पुण्यात कंटेन्मेंट भाग वगळता लॉकडाऊन शिथिल

0
628

पुणे, दि. ४ (पीसीबी) : राज्य शासनाच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेच्या हद्दीतही सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी रात्री उशिरा या बाबतचे आदेश काढले आहेत. हा निर्णय केवळ शहरात ज्या भागात कमी रुग्ण आहेत, त्या भागासाठी असणार आहे. त्यासाठी पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र अशी शहराची विभागणी केली आहे. दरम्यान, ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत, असे 69 भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

उर्वरित शहर प्रतिबंधित क्षेत्रात असेल. तर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात सध्याचे लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात येणार असून, त्या भागात लॉकडाऊन आणि पोलीस बंदोबस्त आणखी कडक करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या भागात करोनाचे रुग्ण कमी आहेत किंवा नाहीत त्या भागातील व्यवहार बहुतांश सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात गेल्या दीड महिन्यांत करोनाचा उद्रेक प्रामुख्याने ज्या भागांत झाला, त्यात औंध-बाणेर, कोथरूड-बावधन आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालये वगळता इतर सर्व परिसरांचा समावेश आहे. त्यातही शिवाजीनगर-घोले रोड, कसबा विश्रामबाग वाडा, भवानी पेठ, ढोले पाटील, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दींचा समावेश आहे.

मात्र, आता यातील ज्या परिसरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत किंवा ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे, तेथील लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरांतील व्यवहार पुन्हा सुरळीत होण्याचे संकेत आहेत. नागरिकांना फिजिकल डिस्टन्स कायम ठेऊनच व्यवहार करावे लागणार आहेत.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शहारासाठीचे नियम

1) सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये व्यापारी संकुलातील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.
2) स्वतंत्र दुकाने, रहिवासी कॉलनीतील दुकाने, रहिवासी संकुलातील दुकाने उघडी राहतील. एकाच परिसरातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व अत्यावश्यक सेवा नसलेली जास्तीत जास्त पाच बिगर अत्यावश्यक दुकानांना आणि तसेच राज्य शासनाने अनुज्ञेय केलेला व्यवसायांना परवानगी राहील.
3) केवळ अनुज्ञेय कामांसाठी वैयक्तिक वाहन वापरता येईल. तथापि, चारचाकी वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल, तर दुचाकी वाहनात मागच्या सीटवर व्यक्तीला नेता येणार नाही.
4) पुणे मनपाने ज्या पूर्व पावसाळी कामांना, मेट्रोच्या कामांना, धोकादायक इमारतीबाबत करावयाची कारवाई तसेच पूरपरिस्थिती होऊ नये म्हणून ज्या कामांना पूर्व परवानगी देण्यात आलेली आहे, अशी बांधकामे सुरू राहतील.
5) प्रतिबंधित क्षेत्राबाहेर शहरी भागामध्ये बाहेरील मजूर न आणता त्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशी बांधकामे आणि अपारंपरिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील.
6) ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करता येईल.
शहरातील या भागात लॉकडाऊन कायम (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र)
मंगळवार पेठ-जुना बाजार, पर्वतीदर्शन परिसर 1,2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, आंबील ओढा कॉलनी परिसर, दत्तवाडी परिसर, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ कसबा – विश्रामबागवाडा, भवानी पेठ कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ, कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती, उंड्री, होलेवस्ती कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड-शिवतारा इमारत, चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत , पुणे स्टेशन-ताडीवाला रोड, पर्वती, तळजाई वस्ती 1,2, धनकवडी, बालाजीनगर, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी साईसमृद्धी परिसर, लोहगाव, कालवडवस्ती नगर रोड, गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर 1,2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा, टी.पी. स्कीम, फुलेनगर, रामनगर वानवडी – रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी, सय्यदनगर 1, 2, 3 कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, मिठानगर, एस.आर.पी.एफ. वानवडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, कामगार पुतळा वसाहत, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू, चिंतामणीनगर, मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, मुंढवा वेताळनगर परिसर, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर हडपसर – मुंढवा हांडेवाडी रस्ता या आणि संबंधित परिसरातील लॉकडाऊन कायम राहणार आहे.