पुण्यातून नवी मुंबईकडे निघालेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले

0
421

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुण्यातून उपचार घेऊन नवी मुंबई येथील घरी निघालेल्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला खासगी कारमधील चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आले आहे. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर तळेगाव जवळ घडली.

गिरीश निकम (वय ४१, रा. नवी मुंबई, खारघर, सेक्टर १२ ) असे मारहाण करुन लुटण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी कळंबोली पोलिसात अज्ञात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम हे सोमवारी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुण्याला आले होते. यावेळी उपचार घेऊन ते रात्री दहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर खारघर येथील त्यांच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. यावेळी एका खाजगी अकॅसेन्ट कारचा चालक  त्यांच्या जवळ आला आणि त्याने कारमध्ये जागा असल्याचे सांगून अडीचशे रुपयात खारघरला सोडतो असे सांगितले. यावर निकम हे राजी झाले आणि कारमध्ये बसले. यावेळी पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरुन मुंबईच्या दिशेने जात असताना तळेगाव जवळ कार पोहचली. या ठिकाणी कारमधील चोरट्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावून एकाने निकम यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसेच रोख रक्कम काढून घेतली. तसेच निकम यांच्या जवळील एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून एटीएम कार्डचा पासवर्ड विचारुन त्याच्या खात्यातील तब्बल ४१ हजार रुपये काढुन घेतले. त्यानंतर त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून कळंबोली भागात सोडून दिले. पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली पोलिस तपास करत आहेत.

निकम हे एका प्रसिध्द मराठी वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार आणि अँकर म्हणून काम पाहतात.