कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो, मग शेतकऱ्यांना अनुदान का नाही ? – राजू शेट्टी

0
464

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो, मग दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान का देत नाही,’ असा सवाल करून दुधासाठी २७ रुपयांच्या आसपास दर वाढवून देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरूवार) राज्य सरकारला दिला.

दुध आंदोलनावर तोडगा काढण्याबाबत बुधवारी रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

यावेळी शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. तरी शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान म्हणून ५ रुपये जमा केले पाहिजेत. शेतकऱ्यांना २७ रुपये दर बांधून देण्यासाठी तडजोड होऊ शकते. त्यासाठी मी सरकारशी चर्चा करायलाही तयार आहे. मला चर्चेला न बोलावताही सरकार निर्णय घेऊ शकते, असेही शेट्टी म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांना ३ रुपये वाढवून देण्यात आले आहेत. आणखी दोन रुपये वाढवून देण्याचा सरकारचा विचार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.  तसेच मार्केट इंटरव्हेशनच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येऊ शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाजन यांची मुख्यमंत्र्यांशी  चर्चा सुरू आहे. ते नागपूरला गेल्यावर पुढच्या हालचाली सुरू होतील, असेही शेट्टी यांनी सांगितले.