पुण्यातील सराईत गुंडांनी आणेवाडी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांवर झाडल्या सात गोळ्या; एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

0
1763

आणेवाडी, दि. २५ (पीसीबी) – टोल चुकवून पळुन चालेल्या कारला अडवल्याच्या रागातून पुण्यातील काही सराईत गुंडांनी पुणे-सातारा महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांवर तब्बल सात गोळ्या झाडल्या. तसेच एका टोल कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आणेवाडी टोल नाक्यावर (एमएच/१२/ एनजे/३०२) ही स्विफ्ट कार आली. बुथ क्रमांक एकवर टोल न भरता कारचालकाने कार तशीच पुढे पळवली. त्यानंतर पळून जाणाऱ्या या कारला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून धरले. या दरम्यान पाठीमागून आलेल्या एका फॉर्च्यूनर कारमधील पाच ते सहा जणांसोबत असलेल्या रोहिदास उर्फ बापू चोरगे या सराईत गुंडाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर कर्मचारी जीव वाचविण्यासाठी पळू लागले. आडोसा पाहून काही जण लपले. त्यातच एक कर्मचारी विशाल दिनकर राजे हे पळत होते. त्यावेळी टोळक्याने त्यांना पकडून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. तर व्यवस्थापक विकास शिंदे यांनी चोरगे याच्या हातातील पिस्तूल काढून घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.  यातील रोहिदास चोरगे हा पुण्यातील सराईत गुंड असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर त्यानंतर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.