पुण्यातील इंटिरिअर डिझाईनर तरुणीला ब्लॅकमेल करुन ३६ हजारांचा गंडा; आरोपी तरुणाला अटक

0
1309

पुणे, दि. १७ (पीसीबी) – ‘टिंडर’ या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला ब्लॅकमेल करत ३६ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील एका १९ वर्षीय इंटिरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीसोबत घडली.

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार आरोपी तरुण सुबोजित अभिजीत दासगुप्ता (वय २९, रा. संदेश सिटी, नागपूर) विरोधात फसवणूकिचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी पुण्यातील एका कॉलेजमध्ये इंटिरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी तीची आरोपी सुबोजित सोबत ‘टिंडर’ या डेटिंग अॅपवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून आरोपी तरुणाने तिचे फोटो घेतले. मात्र हे फोटो वायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्याकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली. सुरुवातीला सुबोजितने तिच्याकडून ३६ हजार रुपये उकळले. यानंतरही तो सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करु लागला. यामुळे वैतागलेल्या तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुबोजित याला अटक केली. डेक्कन पोलिस अधिक तपास करत आहेत.