पिंपरी-चिंचवडमध्ये गतवैभव मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीतच दाखवावी लागणार ताकद

0
3795

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – तीन आमदार, महापालिकेवर पूर्ण वर्चस्व, अशी मजबूत स्थिती एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मात्र आता हे सर्वच सांगण्यासाठीच राहिले आहे. आजच्या स्थितीत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. महापालिकेत फक्त ३६ नगरसेवक आहेत. (त्यातील अर्ध्याहून अधिक नगरसेवक भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत). शहराच्या राजकारणातही फारसे वर्चस्व राहिलेले नाही. मात्र शहरात पक्षाला हेच पूर्ववैभव मिळू शकते. संघटना बांधणीच्या बळावर दोनपैकी एक तरी खासदार निवडून आणून ताकद दाखवावी लागणार आहे. तरच पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठी आशा निर्माण होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होता. खुद्द अजितदादांचा मजबूत बालेकिल्ला म्हणून या शहराकडे पाहिले जात होते. मात्र २०१४ या सालापासून पक्षाला घरघर लागली आणि शहरात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली. भाजपची मोदी लाट त्याला एक कारण आहेच. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेला पक्षाचे बळ स्थानिक निवडणुकीत असते. तेच महापालिका निवडणुकीत घडले. राष्ट्रवादीने महापालिकाही गमावली. त्यामुळे पक्षाला मिळणारा आर्थिक डोस बंद झाला. आता आगामी लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. शहराचा समावेश असलेले मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीकडेच आहेत. निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली, तरी अद्याप राष्ट्रवादीतर्फे उमेदवारांचे नाव दृष्टिपथात नाही.

शहरात पक्ष नेतृत्वाची यादी काढली तर ती मोठी आहे. ही नावे का कागदावर अत्यंत दमदार वाटतात. स्वतः अजितदादांचे शहर संघटनेवर कमांड आहे. परंतु, प्रत्यक्षात निवडणुकीत पक्ष कमजोर का पडतो?, याचाच विचार करण्याची खरी गरज आहे. प्रत्येक पक्षात दिसणारी गटबाजी राष्ट्रवादीतही आहे. या गटबाजीचा परिणाम थेट निवडणुकांत दिसून येतो. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आता बास झाले गटबाजीचे धोरण अवलंबवावे लागणार आहे. पक्षाची गाठ संघटन मजबूत असलेल्या भारतीय जनता पक्षाशी आहे, हे विसरून चालणार नाही.

शिवाय पक्षाला शहरातील गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपली ताकद आगामी लोकसभा निवडणुकीतच दाखवावी लागणार आहे. जर राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मोठी कठीण परिस्थिती असणार आहे. या दोन्ही निवडणुकीत अपयश आले की २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची भयानक परिस्थिती असेल. त्याची पक्षनेतृत्वाला कल्पना असणारच आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. स्वतः अजितदादा शहरात पक्षाला पुन्हा उभारी मिळवून देणार की त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची जहाज स्थानिक गटबाजीत गुरफटणार, त्यांची रणनिती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.