पेणजवळ मोटार नाल्यात पडून भोसरीतील ५ जण जखमी; चालकाचा मृत्यू

0
1631

पेण, दि. २२ (पीसीबी) – भोसरीतील तरूणांची मोटार अलिबागवरून पुण्याच्या दिशेने येत असताना मद्यधुंद चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार नाल्यात पडून अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोसरीतील पाच तरूण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. २१) रात्री पावणे अकराच्या सुमारास पेणजवळील आंबेगाव येथे झाला.

रिकी रामकृष्ण अग्रवाल (वय ३५), मयुर नरेश अग्रवाल (वय २५), शिवम नरेश अग्रवाल (वय १८), अनिल विनोद अग्रवाल (वय २४), शिवकुमार सियाराम प्रजापती (वय २४, रा. सर्व भोसरी) अशी जखमी झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर कारचालक विशाल याचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भोसरी येथे राहणारे तरूण रविवारची सुट्टी साधून अलिबागला फिरायला गेले होते. रात्री उशिरा ते तेथून पुण्याच्या दिशेने निघाले. सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. येताना आंबेगावजवळ त्यांनी पुढे जाणाऱ्या एका मोटारसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीचालक खाली पडल्याने जखमी झाला. अपघात झाल्यानंतर घाबरून ते पळून जाऊ लागले. वेगाने जात असताना पुढे सुमारे २०० मीटरवर एक वळण होते. अंधारात चालक विशाल याला त्याचा अंदाज आला नाही व वेगामुळए त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी नाल्यात पडली. पोलिस तपास करत आहेत.