पुणे शहरात करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

0
516
पुणे, दि.१६ (पीसीबी) – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचे भारतात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुणे शहरात करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीस होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
तसेच पुणे जिल्हयामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व शॉपींग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापनामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.