पुणे विद्यापीठातील अभियंत्याच्या अंगावर ऑईल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0
856

पुणे, दि. १ (पीसीबी) –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्यावर कामाच्या वादातून दोघांनी ऑईल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बांधकाम सहाय्यक अभिजित साठे व स्वीपर नितीन प्रसाद या दोघांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांचा आरोपी साठे आणि प्रसाद यांच्यासोबत कामाच्या कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. या वादातून आरोपींनी पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारण्याची मोठा दगड देखील उचलला होता. मात्र सुदैवाने पाटील या हल्ल्यात बचावले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी साठे आणि प्रसाद यांना चतु:श्रृंगी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.