विंडीजविरुद्ध भारताने नोंदवला सलग आठवा मालिका विजय

0
455

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना भारताने विंडीजला ९ गडी राखून जिंकले आणि विंडीजविरुद्ध भारताने हा सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला १०४ रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली.

नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. २ धावांत विंडीजने २ गडी माघारी परतले होते. त्यानंतर सम्युअल्सने काही काळ विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण तो २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर रोवमन पॉवेलने ३९ चेंडूत १६ धावा करून माघारी परतला. कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २५ धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण तोदेखील लवकर बाद झाला. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २ आकडी धावसंख्या गाठता आली नाही. जाडेजाने ४, बुमराह व अहमदने २-२ तर कुलदीप आणि भुवनेश्वर कुमारने १-१ गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन हा ६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावत ६२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने २९ चेंडूत ३३ धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजकडून थॉमसने एकमेव बळी टिपला.