पुणे-मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुल बनविण्याची आमदार शेळके यांची मागणी.

0
227

मावळ, दि. ०४ (पीसीबी) : मावळ तालुक्यातील देहूरोड सेंट्रल ते कार्ला दरम्यान वारंवार वाहतुक कोंडी व अपघात वाढत असलेल्या ६ ठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी
सोमवारी (दि.४) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन केली.

मावळ तालुक्यातील देहूरोड सेंट्रल, सोमाटणे, लिंब फाटा (तळेगाव दाभाडे), वडगाव – तळेगाव फाटा, कान्हे फाटा व कार्ला आदि ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर या ठिकाणी उड्डाणपुल नसल्याने महामार्ग हा धोकादायक झाला असुन वाहतूक संथगतीने तसेच अडथळ्याची ठरत आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाऊन या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्याची मागणी केली आहे.

तळेगाव – चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळचे आमदार शेळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी देहूरोड सेंट्रल ते कार्ला दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी व अपघात होणाऱ्या सहा ठिकाणी उड्डाणपुल करण्याची मागणी केली.