पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ दोन कारमधील भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

0
620

लोणावळा, दि. १५ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ स्वीफ्ट कार आणि सँट्रो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवार (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चुराडा झाला आहे.

अपघातात स्वीफ्ट कारमधील संजीव मोहनसिंग कुशवाह (वय १७), कृष्णा रमेश शिरसाठ (वय २२), निखिल बालाजी सरोदे (वय २०, रा. सर्व जण श्रीनगर, रहाटणी, पुणे). तर सँट्रो कारमधील मृत- राजीव जगन्नाथ बहिरट (वय ५२), सोनाली राजीव बहिरट (वय ४६), जान्हवी राजीव बहिरट (वय २०), जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय ८३, रा. सर्वजण सर्व्हे नं ५२, कलाशंकर नगर, बीटी कवडे नगर, मुंढवा, पुणे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. प्रतिक बालाजी सरोदे (वय १८), आकाश मदने (वय १७) आणि रोहित कड (वय १६, सर्व रा. पुणे)  ही जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कन्हे फाटा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारी स्वीफ्ट (एम.एच/१४/सी.एक्स/८३३९) याच्या चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील दुसऱ्या लेन वरुन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या सॅन्ट्रो सँट्रो (एम.एच/१२/इ/एक्स/१६८२) या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्वीफ्टमधील ३ प्रवासी आणि सॅन्ट्रोमधील ४ असे एकूण ७ सात जण जागीच ठार झाले. तर तिघांची प्रकृती अद्याप चिंताजणक आहे. अपघातामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी  झाली होती. काही प्रवाशांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने कटर मशीनने मृतदेह कापून बाहेर काढावे लागले. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.