सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास त्वरीत आंदोलन मागे घेऊ- राजू शेट्टी

0
552

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. सरकारने जर आज विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रूपये अनुदान जमा करण्याची घोषणा केली तर आम्ही आजच आंदोलन मागे घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी कधीच बोलावले नाही. त्यांनी निमंत्रण कधी दिले होते, असा सवाल करत मी कधी नकार दिला हे त्यांनी जाहीर करावे. चर्चेला आम्हाला बोलावले असेल तर त्यांनी पुरावे जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी नेहमी तयार असल्याचे ते म्हणाले.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात दूध माफिया तयार झाले असून त्यांनी ५३ कोटींवर डल्ला मारल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. दुधाचा धंदा हा तोट्याचा आहे. शेतकऱ्यांनी किती दिवस हे सहन करायचे. सरकारच्या आडमुठेपणामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन आम्ही रात्री १२ वाजता सुरू करणार होतो. पण पोलिसांनी सरकारच्या आदेशावरून कार्यकर्त्यांना रविवारी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घरी महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कार्यकर्त्यांनी दूध कमी प्रमाणात सांडले आहे. शेतकऱ्यांना दोष देऊ नका. त्यांनी विद्यार्थी, गोरगरीब आणि वारकऱ्यांना मोफत दूध वाटण्यात आले आहे. ९० टक्के दूध चांगल्या कामासाठी वापरले आहे.