पुणेकरांच्या सहभागातून तयार होणार तब्बल ‘वीस हजार किलोची मिसळ’

0
82
  • क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर वापरणार

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर २० हजार किलोची मिसळ बनविणार आहेत.

दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक ११ आणि १४ एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली.

गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ आणि दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

*२० हजार किलो मिसळ करण्याकरिता लागणार भव्य कढई व हजारो किलो साहित्य
मिसळ तयार करण्याकरिता १५ बाय १५ फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची ६.५ फूट असून २५०० किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे.

उपक्रमामध्ये २० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी २००० किलो, कांदा १६०० किलो, आलं ४०० किलो, लसूण ४०० किलो, तेल १४०० किलो, मिसळ मसाला २८० किलो, लाल मिरची पावडर ८० किलो, हळद पावडर ८० किलो, मीठ १०० किलो, खोबरा कीस २८० किलो, तमाल पत्र १४ किलो, फरसाण ५००० किलो, पाणी २०००० लिटर, कोथिंबीर २५०, लिंबू २००० नग जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आहे. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश १ लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास १ लाख यांसह १००० किलो दही व स्लाईड ब्रेड ३ लाख नग असे साहित्य वापरण्यात येणार आहे. पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.