पुण्यात आज दुकाने बंद; व्यापारी महासंघ आणखी 1 दिवस वाट पाहणार

0
225

पुणे, दि. १२ (पीसीबी) : आज दुकाने उघडण्याचा निर्णय १ दिवसापुरता स्थगित केला असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेने शहरातील दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुणे व्यापारी महासंघाने या निर्णयाला विरोध केला आणि सोमवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि पुणे व्यापारी महासंघाची बैठक रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झाली. ही बैठक रात्री साडेनऊच्या सुमारास संपली. दुकाने उघडल्यावर पोलिसांनी खटले भरल्यास व्यापारी महासंघ जबाबदारी घेणार नाही, असे स्पष्टीकरण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सोमवारी पहाटे केले. त्यामुळे शहरातील दुकाने उघडण्यावर व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट झाले.